स्फुट प्रकर

222 0 0
                                    

स्फुट प्रकरणे - भाग ६

रुरु आणि प्रमद्वरा

महाभारताच्या आदिपर्वात सुरवातीला भृगुऋषींच्या कुळातील अनेक व्यक्तींच्या कथा आहेत. त्यांतील एक पुरुष म्हणजे रुरु. भृगूचा पुत्र च्यवन, त्याचा पुत्र प्रमति व त्याला घृताची नावाच्या अप्सरेपासून झालेला पुत्र म्हणजे रुरु. रुरुचा पुत्र शुनक व नातू शौनकऋषि. हा ऋषि व त्याचे सहकारी यांनी एक द्वादशवर्षीय यज्ञसत्र केले. त्या सत्रासाठी जमलेल्या अनेक ऋषिमुनींना, संध्याकाळच्या वेळी, सूत लोमहर्षण याचा पुत्र, सौति नावाचा पुराणिक, मनोरंजनासाठी अनेक कथा सांगत असे. पूर्वी व्यासांनी परीक्षितपुत्र जनमेजयाला त्याच्या पूर्वजांच्या कथा सांगितल्या होत्या. तो मूळ 'जय'ग्रंथ. (परीक्षित हा पांडवांचा नातू अभिमन्यूचा पुत्र. आपला मृत्यु समीप आल्यावर त्याला युधिष्ठिराने हस्तिनापुराच्या राज्यावर स्थापित केले होते.) त्या 'जय' ग्रंथांतिल कथा सौतीने खूप विस्ताराने सांगितल्या व 'जय'चे महाभारत झाले. असा रुरूचा महाभारताशी दूरचा संबंध आहे.

रुरुला शुनक हा पुत्र प्रमद्वरा या त्याच्या पत्नीपासून झाला. रुरु आणि प्रमद्वरा यांची कथा ही एक प्रेमकहाणीच आहे.

विश्वावसु नावाच्या गंधर्वराजापासून मेनका अप्सरेला प्रमद्वरा ही कन्या झाली. मात्र जन्मत:च मेनकेने तिला स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ नदीकाठी ठेवून दिले व ती 'निर्घृण व निर्लज्ज स्त्री' (महाभारतकारांचे वर्णन) खुशाल चालती झाली. तीच ही मेनका, जिने शकुंतलेला असेच जन्मत:च कण्वमुनींच्या आश्रमापाशी सोडून दिले होते! यावेळींहि तिच्या कन्येला स्थूलकेश ऋषींनी उचलले व तिचा सांभाळ केला व लहानाची मोठी केली. ती रूपवान व गुणवान असल्यामुळे तिचे प्रमद्वरा असे नाव पडले.

रुरु हा एक विद्वान ऋषि होता. एकदा प्रमद्वरा काही कारणाने रुरूच्या नजरेला पडली व त्याचे तिच्यावर प्रेमच जडले. त्याने मित्रांतर्फे ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. त्यांनी स्थूलकेशाकडे प्रमद्वरेसाठी रीतसर मागणी घातली व ती मान्य होऊन रुरु व प्रमद्वरा यांचा विवाह ठरला. मात्र विवाह होण्यापूर्वी काही दिवस आधी, प्रमद्वरा मैत्रिणींसह क्रीडा करत असताना चुकून तिचा पाय एका झोपलेल्या भुजंगावर पडला. त्याने तिला दंश केला व ती कोसळली. अनेक ऋषि व रुरु जमा झाले पण ती गतप्राणच झाली. सर्वजण शोकमग्न झाले. रुरु एकटाच वनात जाऊन आक्रोश करत बसला. तिची आठवण काढून तो स्वत:शी म्हणत राहिला कीं माझ्या हातून जर तपश्चर्या, दान व गुरुसेवा घडली असेल तर माझी प्रिया जिवंत होवो. बराच काळ त्याने असा विलाप केल्यावर एक देवदूत आला व त्याला समजावूं लागला कीं 'हिचे आयुष्यच संपले आहे त्याला काय करणार? तुझे आयुष्य तूं तिला देतोस काय?' रुरूने म्हटले कीं 'माझ्या उरलेल्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तिला मिळो व ती जिवंत होवो' (सर्व आयुष्य देऊन काय उपयोग कारण मग रुरुच मरून जाणार!) मग तो देवदूत व गंधर्वांचा राजा यमधर्माकडे गेले व त्यांनी रुरूसाठी रदबदली केली. यमानेहि ते मान्य केले. रुरूच्या उरलेल्या दीर्घ आयुष्यातील अर्धे प्रमद्वरेला मिळाले व ती जिवंत झाली! मग रुरु आणि प्रमद्वरेचा विवाह झाला.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Mar 19, 2009 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

स्फुट प्रकरWhere stories live. Discover now